Arca da aliança
A Arca da Aliança era o símbolo mais sagrado de Israel — representava a presença de Deus no meio do seu povo. Sobre ela brilhava a glória do Senhor entre os querubins.
"बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी. तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा. त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या. बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा. हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत." देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा. मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी; मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत. त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करुबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, "पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर. साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.
परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला. जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, "हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत." जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, "हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये."
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्याकडून बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक मनुष्याचे नाव त्यांच्या त्यांच्या काठीवर लिही.
"लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे. या काठ्या दर्शनमंडपामध्ये आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे. खरा याजक म्हणून मी एका मनुष्याची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन."
म्हणून मोशे इस्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्यास काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती. मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.
दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्यास दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते. म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.) तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, "पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत, नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे." नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, "कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे." तो लोकांस म्हणाला, "चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे."
तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.
पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले. मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, "आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे." मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते. परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली. तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, "इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?" मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, "परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही. आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे. अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा." पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले. आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले.
मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले. तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, "इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे." मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, "इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?" ते बोलले, "इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा." मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला. परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या. मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, "देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे." मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, "इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये." कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.
आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला. आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, "परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा." ते म्हणाले, "तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल."
मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली. मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या. मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले. तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले. मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या. लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.
कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.
पुढे लोक दावीदाला म्हणाले, "ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे." कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. परमेश्वराचा कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले. सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता. दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते.
इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरूशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले. तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी शलमोन राजासमोर एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा सनाचा माहिना चालू होता. इस्राएलची सर्व वडिलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला. त्याबरोबरच दर्शनमंडप, परमेश्वराचा कोश, तेथील सर्व पवित्र पात्रे लेवींनी व याजकांनी वरती वाहून नेली. राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक कराराच्या कोशासमोर आले. तेथे त्यांनी अनेक बली अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते. मग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला. करुबांचे पंख पवित्र कराराच्या कोशावर पसरलेले होते. कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते. हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत. कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता. परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले, व मेघामुळे याजकांना उभे राहता येईना.
अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे.
मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.
माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.
आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या, बाहेरील खोली त्यास पवित्रस्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या. आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्रस्थान म्हणत त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही.
तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.