Arca de noé
A arca de Noé é história de salvação e fidelidade. Deus instruiu Noé a construir a arca para salvar sua família e os animais do dilúvio — exemplo supremo de obediência e fé.
म्हणून देव नोहाला म्हणाला, "मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन." तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. देव म्हणाला, "तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे.
तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर.
नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, "चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.
नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.
पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही, देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले. मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.
देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.
मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले. मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.
अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.
पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.
सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले.
चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.
नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले.
तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.
असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता.
देव नोहाला म्हणाला, "तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये. तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत."
मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, "माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो, आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो. अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही."
मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे.
विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले. आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.