Arca de noé
A arca de Noé é história de salvação e fidelidade. Deus instruiu Noé a construir a arca para salvar sua família e os animais do dilúvio — exemplo supremo de obediência e fé.
तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, "मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे. तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर.
याहवेह नोआहला म्हणाले, "तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे.
जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला. तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले. आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला.
नर व मादी असे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जोडीजोडीने आले. मग याहवेहने त्यांना आत ठेवून तारवाचे दार बंद केले.
जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले.
पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.
पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.
आणखी चाळीस दिवसानंतर नोआहने तारवात बनविलेली खिडकी उघडली आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले. परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले. आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले. संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे. मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही.
नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले.
मग परमेश्वराने नोआहला सांगितले, "तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे. प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील."
मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले: "आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो. तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो. यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो."
पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह म्हणून माझे मेघधनुष्य मी मेघात ठेवले आहे
विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.
ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते. ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते. ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.
जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.