प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय
1 मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही. 3 आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. 5 प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. 6 प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. 7 प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.