ख्रिस्तशिष्यांना तारणप्राप्तीची आशा आहे म्हणून आभारप्रदर्शन
6 आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता. 7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. 8 तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. 9 कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.