पती व पत्नी
1,2 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. 3 तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; 4 पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. 5 कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. 6 उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात.