13 शलमोन राजाने सर्व इस्राएल लोंकावर वेठबिगार बसवला यासाठी तीस हजार माणसे नेमली. 14 अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. 15 ऐंशी हजार लोकांस शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती. 16 शलमोनाच्या कामावरील मुख्य अमलदाराखेरीज आणखी तीन हजार तीनशे अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते.