22 परंतु हन्ना वर गेली नाही; ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, "मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्यास नेईन, जेणेकरून तो परमेश्वरापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील." 23 तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, "तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो." मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले. 24 आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.