हन्नाचे गीत
1 मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली,
"माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे;
माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे;
माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे,
कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
2 परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही,
कारण तुझ्या शिवाय कोणी नाही,
आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
3 अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका;
तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो.
कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे;
त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
4 पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत,
परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.
5 जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत;
आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत.
वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे,
परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.
6 परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो.
तो अधोलोकास नेतो व वर आणतो.
7 परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो.
तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.
8 तो गरीबाला धुळीतून वर उठवतो;
तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो;
यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे
आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे.
कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत;
त्याने त्यावर जग ठेवले आहे.
9 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील,
परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील,
कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
10 देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील;
आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील.
परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील;
तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील."