मरण पावलेल्या ख्रिस्त शिष्यांबद्दल समाधान
13 पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. 14 कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
15 कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. 16 कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. 17 मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
18 म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.