खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम
1 पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील. 2 पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.