नामानाचे कोड नाहीसे होते
1 नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्यास कोड होते. 2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली. 3 ती आपल्या धनीणीला म्हणाली, "आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल." 4 कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे. 5 त्यावर अरामाचा राजा म्हणाला, "आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो." तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कारसाधारण 340 किलोग्राम चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले. 6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यामध्ये लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे. 7 इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, "मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे." 8 राजाने कपडे फाडले हे देवाचा मनुष्य अलीशा याने ऐकले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, "तू आपले कपडे का फाडलेस? त्यास माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलामध्ये संदेष्टा असल्याचे त्यास कळेल." 9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला. 10 अलीशाने निरोप पाठवला, "तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील." 11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, "पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील. 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यामध्येच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?" एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. 13 मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, "माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?" 14 तेव्हा त्याने देवाचा मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला.