11 तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो, 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. 13 त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे; 14 आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. 15 आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील. 16 त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.
Publicidade