लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे
1 पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते. 2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत. 3 पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. 4 तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, "आमच्याकडे पाह." 5 तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. 6 आणि पेत्र म्हणाला, "रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग." 7 आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले. 8 आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला. 9 आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल. 10 आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.