4 हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. 6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. 7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. 8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. 9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले. 22 परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील. 25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.