प्रत्येक गोष्टीस उचित काळ
1 प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
2 जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते.
रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
3 ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते.
मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते.
4 रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते.
शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
5 धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते.
दुसऱ्या लोकांस आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते.
6 गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते.
गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
7 वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते.
शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.
8 प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.
युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते.