17 परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, "हे तू करतोस ते चांगले नाही. 18 तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. 19 तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने. 20 तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग. 21 तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. 22 या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. 23 तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील."