18 नंतर परमेश्वर देव बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन." 19 परमेश्वर देवाने मातीमधून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली. 20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू-पक्षी पाहिले परंतु त्यांमध्ये त्यास सुसंगत असा मदतनीस सापडला नाही.
21 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. 22 परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले. 23 तेव्हा मनुष्य म्हणाला,
"आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे."
24 म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील.