येशूचे मरीयेला दर्शन
11 पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; 12 आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. 13 आणि ते तिला म्हणाले, "मुली, तू का रडतेस?" ती त्यांना म्हणाली, "त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही." 14 असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. 15 येशूने तिला म्हटले, "मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?" तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, "साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन." 16 येशूने तिला म्हटले, "मरीये," ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, "रब्बूनी," (म्हणजे गुरूजी) 17 येशूने तिला म्हटले, "मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो." 18 मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले.