येशूचे थोमाला दर्शन
24 येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. 25 म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, "आम्ही प्रभूला पाहिले." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही."
26 आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, "तुम्हास शांती असो." 27 मग तो थोमाला म्हणाला, "तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो." 28 आणि थोमाने त्यास म्हटले, "माझा प्रभू आणि माझा देव!" 29 येशूने त्यास म्हटले, "तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!"