जन्मांधळ्याला दृष्टी देणे
1 तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. 2 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, "रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?" 3 येशूने उत्तर दिले, "ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. 4 ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. 5 मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे." 6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला. 7 आणि त्यास म्हटले, "जा, शिलोहाच्या तळ्यात धू." (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला. 8 म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, "तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?" 9 कोणी म्हणाले, "हा तो आहे." दुसरे म्हणाले, "नाही, हा त्याच्यासारखा आहे." पण तो म्हणाला, "मी तोच आहे." 10 म्हणून ते त्यास म्हणाले, "मग तुझे डोळे कसे उघडले?" 11 त्याने उत्तर दिले, "येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले." 12 तेव्हा त्यांनी म्हटले, "तो कोठे आहे?" तो म्हणाला, "मला माहीत नाही."