जन्मांधळ्याला दृष्टी देणे
1 तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. 2 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, "रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?" 3 येशूने उत्तर दिले, "ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. 4 ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. 5 मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे." 6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला. 7 आणि त्यास म्हटले, "जा, शिलोहाच्या तळ्यात धू." (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.