अम्माऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन
13 त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, "चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?" चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, "या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?" 19 येशू त्यांना म्हणाला, "तुमच्या मते कोणत्या गोष्टी?" ते त्यास म्हणाले, "नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, 23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही." 25 मग येशू त्यांना म्हणाला, "संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?" 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. 28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, "आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे." मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला. 30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, "तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?" 33 मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, "खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे." 35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले.