पहिल्या शिष्यांस पाचारण
1 मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, 2 तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. 3 त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. 4 त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, "होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड." 5 शिमोनाने उत्तर दिले, "साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो." 6 मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली 7 तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. 8 हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, "प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे." 9 कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. 10 तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, "भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." 11 मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.