शताधिपतीचा चाकर
1 ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला.
2 तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. 3 मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. 4 जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. 5 कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. 6 त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. 7 त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. 8 कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. 9 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, "मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही." 10 आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.