12 दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, "समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो." 13 पण तो त्यांना म्हणाला, "तुम्हीच त्यांना खायला द्या." ते म्हणाले, "आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही." 14 कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, "पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा," 15 मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. 16 त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. 17 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.