येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो
1 काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. 2 तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता. 3 मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. 4 परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. 5 त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." 6 तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, 7 "हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?" 8 आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? 9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?" 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, 11 "मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा." 12 मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, "आम्ही असे कधीच पाहिले नव्हते."