3 "ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला; 4 आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले. 5 काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले. 6 पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. 7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्यास काही पीक आले नाही. 8 काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले." 9 तो म्हणाला, "ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको."