ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात
1 हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, 2 "यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत." 3 जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; 4 हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? 5 ते त्यास म्हणाले, "यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की;
6 ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता,
तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही
कारण तुझ्यातून असा सरदार निघेल
जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’"
7 मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. 8 त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, "तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन." 9 राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. 10 तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला. 11 नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली. 12 देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.