2 परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो. 3 परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
4 तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो. 5 त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.
6 त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
7 परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो. 8 पण तो त्याच्या शत्रूंचानिनवे पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.