11 नामी म्हणाली, "माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? 12 माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले, 13 तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे."