कुर्हाड पाण्यावर तरंगते
1 संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, "पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे. 2 चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या."
आणि तो म्हणाला, "जा."
3 त्यापैकी एकाने म्हटले, "कृपया तुम्ही तुमच्या सेवकासोबत येणार काय?"
अलीशाने उत्तर दिले, "मी तुमच्याबरोबर येतो." 4 आणि तो त्यांच्यासोबत गेला.
ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले. 5 त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, "अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्हाड उसनी मागून आणली होती!"
6 परमेश्वराच्या मनुष्याने विचारले, "ते कुठे पडले?" तेव्हा त्या शिष्यांनी ती जागा त्याला दाखविली. तेव्हा अलीशाने एक लाकूड तोडून त्या जागेवर टाकले. आणि ते कुर्हाडीचे पाते येऊन पाण्यावर तरंगू लागले. 7 तो म्हणाला, "ती काढून घे." मग त्याने हात लांब करून ती घेतली.