Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 16:16-34

पौल व सीला तुरुंगात

16 एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे. 17 ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, "हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत." 18 असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, "मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!" आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला.

19 आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले. 20 त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, "ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत 21 आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत."

22 मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला. 23 त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला. 24 असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.

25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. 26 अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले. 27 तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. 28 परंतु पौल ओरडून म्हणाला, "तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!"

29 तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. 30 त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, "महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?"

31 त्यांनी सांगितले, "प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." 32 तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. 33 मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. 34 त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.