शेवटचा काळ
1 "त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल. 2 पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. 3 जे सुज्ञ आहेत12:3 किंवा जे ज्ञान वाटतात ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्यांप्रमाणे चकाकतील.