10 "त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.25:10 म्हणजे 110 सें.मी. लांब, 68 सें.मी. रुंद व उंच 11 त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा. 12 त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला अशा त्या बसवाव्यात. 13 मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे. 14 कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या. 15 या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये. 16 मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.
17 "प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे. 18 मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत. 19 एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब असावे; ते करूब झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घ्यावे. 20 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादले जावे. करुबाचे मुख समोरासमोर असून, त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे असावी. 21 हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.