शब्द देही झाला
1 प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. 2 तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. 3 शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. 4 त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. 5 तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले1:5 किंवा समजले नाही.
6 परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. 7 तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. 8 तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता.
9 जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. 10 तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. 11 ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. 12 परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— 13 ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.
14 शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
15 योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, "ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ " 16 त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे. 17 कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे. 18 परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.