येशू थोमाला दर्शन देतात
24 येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता. 25 इतर शिष्य त्याला सांगू लागले, "आम्ही प्रभूला पाहिले!"
परंतु तो त्यांना म्हणाला, "त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही."
26 एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, "तुम्हाला शांती असो!" 27 नंतर त्यांनी थोमाला म्हटले, "तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो."
28 थोमाने म्हटले, "माझे प्रभू व माझे परमेश्वर!"
29 मग येशूंनी त्याला म्हटले, "कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे धन्य होत."