काळजी करू नका
22 तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: "मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल चिंता करू नका. 23 अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? 24 कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात! 25 शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?12:25 किंवा आपली उंची हातभर वाढवता येईल काय 26 तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता?
27 "रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. 28 जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील! 29 तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. 30 कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. 31 परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.
32 "हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो. 33 तुमची मालमत्ता विका आणि गरिबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा पिशव्या स्वतःसाठी घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही. 34 कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल.