हरवलेल्या मेंढराचा दाखला
1 आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. 2 हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, "येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात."
3 त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: 4 "समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय? 5 ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल 6 आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ 7 त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.