जकातदार जक्कय
1 येशू यरीहोत प्रवेश करून त्यातून जात होते, 2 तिथे जक्कय नावाचा एक मनुष्य होता; तो प्रमुख जकातदार होता आणि श्रीमंत होता. 3 येशू कोण आहे हे पाहण्याची त्याची उत्कट इच्छा होती, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे गर्दीतून पाहणे त्याला शक्य नव्हते. 4 तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.
5 येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, "जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे." 6 तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
7 सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, "तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे."
8 पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभूजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो."
9 येशू त्याला म्हणाले, "आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे. 10 मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे."