येशू पाच हजारांना जेवू घालतात
13 जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. 14 जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले.
15 संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, "ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या."
16 यावर येशूंनी उत्तर दिले, "त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या."
17 त्यांनी उत्तर दिले, "आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत."
18 येशू म्हणाले, "ते माझ्याकडे आणा." 19 येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. 20 ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. 21 जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.