मत्तयाला पाचारण
9 मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, "माझ्यामागे ये," आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
10 नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. 11 ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, "तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?"
12 हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, "जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. 13 ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’9:13 होशे 6:6 पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे."