11 आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.
12 यास्तव, बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ऋणी आहोत, परंतु देहस्वभावाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. 13 कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल.
14 कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत, 15 पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता. 16 कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. 17 ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.