28 आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात. 29 ज्यांच्याविषयी परमेश्वराला पूर्वज्ञान होते व त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, यासाठी त्यांना पूर्वनियोजित केले होते की त्यांनी अनेक बंधू आणि भगिनीमध्ये ज्येष्ठ असे व्हावे. 30 आणि त्यांनी ज्यांना पूर्वनियोजित केले, त्यांना बोलाविले; व ज्यांना बोलाविले, त्यांना नीतिमान ठरविले व ज्यांना नीतिमान ठरविले, त्यांचे त्यांनी गौरव ही केले.
अधिक विजयी
31 अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल? 32 ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय? 33 परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. 34 तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत. 35 मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय? 36 कारण असे लिहिले आहे:
"तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो,
वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे."8:36 स्तोत्र 44:22
37 नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, 39 अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.