Coração quebrantado
Deus está perto dos que têm o coração quebrantado. A Bíblia consola os aflitos: o sacrifício que Deus aceita é o espírito quebrantado e um coração contrito — jamais desprezará.
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात
आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे,
हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय
तुम्ही धिक्कारणार नाही.
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
माझे शरीर व माझे हृदय खचेल,
तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून
सर्वकाळचा माझा वाटा आहेत.
जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे
जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात—
"मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो,
परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो,
मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो
व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.
माझ्या हाताने हे सर्व घडवले
आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?"
अशी याहवेह घोषणा करतात.
"ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात:
जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत,
आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
याहवेहच्या कृपेचे वर्ष
आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,
आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना—
राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट,
विलापाऐवजी
आनंदाचे तेल,
निराशेच्या आत्म्याऐवजी
स्तुतीचे वस्त्र
बहाल करण्यासाठी.
कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी
ते नीतिमत्तेचे एला वृक्ष
याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.
"धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत,
कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.
कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते. या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.
त्यांनी म्हटले, "माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते." कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.