Sinais do fim dos tempos
A Bíblia descreve sinais que precederão a volta de Jesus. Guerras, falsos mestres, sinais cósmicos e a pregação do evangelho a todas as nações — tudo aponta para o fim dos tempos.
Sinais proféticos
Este evangelho do Reino será pregado em todo o mundo e então virá o fim. Os sinais dos últimos tempos já se manifestam.
सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
"क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर
" ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
आकाशातून तारे गळून पडतील,
आणि आकाशमंडळ डळमळेल.’
"मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील. तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.
"यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.
आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे."
"तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.
Os últimos dias
Nos últimos dias virão tempos difíceis, homens amantes de si mesmos. Mas derramarei o meu Espírito sobre toda a carne.
हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र, ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे, विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील. ते भक्तीचा देखावा करतील, परंतु त्याच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा.
" ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात,
मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन.
तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील,
व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील,
तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
आणि ते भविष्यवाणी करतील.
वर आकाशात व खाली पृथ्वीवर,
रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी
विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
प्रभूचा महान व गौरवी दिवस
येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व
चंद्र रक्तमय होईल.
आणि जो कोणी प्रभूच्या नावाने
त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’
"आणि त्यानंतर,
मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन.
तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील,
व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील,
तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
"त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल. पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्यांप्रमाणे चकाकतील.
Esperança e prontidão
O dia do Senhor virá como ladrão. Mas nós não somos das trevas — estejamos sóbrios, vigiliando e esperando.
स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू. या वचनांद्वारे परस्परांना प्रोत्साहन द्या.
आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.
"सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल. कारण संपूर्ण पृथ्वीवर राहणार्या सर्व लोकांवर तो येईल. पुढे घडणार्या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा."
प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.
ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे. तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील. परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.
ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.
"कारण पाहा,
मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन.
पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही,
मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.
परंतु मी जी निर्मिती करेन
त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा.
कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय
व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
मी यरुशलेमसाठी आनंद करेन
आणि माझे लोक मला आनंददायी होतील;
यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी
कधीही कानांवर पडणार नाही.
सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, "निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.
नंतर मी, "एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश" पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, "पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत."