प्रभू येशूच्या पुनरागमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना
1 बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, 2 तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; 3 कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; 4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.