प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य
15 ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. 16 कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. 17 तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. 18 तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे. 19 हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता. 20 आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.