मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे म्हणून सदस्यांमध्ये एकी असावी
1 म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. 2 सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. 4 ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे ‘त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे.’ 5 एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, 6 एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.
7 ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे. 8 वचन असे म्हणते.
जेव्हा तो वर चढला,
तेव्हा त्याने कैद्यास ताब्यात घेतले व नेले,
आणि त्याने लोकांस देणग्या दिल्या.
9 आता, जेव्हा वचन असे म्हणते, "वर चढला" तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? 10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या. 11 आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली. 12 त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्रजनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर आत्मिकरित्या सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या.