Publicidade

Efésios 5

1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.

3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. 4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. 5 कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.

6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. 10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे.

13 सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे

"हे झोपलेल्या जागा हो,

आणि मरण पावलेल्यातून ऊठ,

आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल."

15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. 18 आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, 19 सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. 20 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. 21 ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.

ख्रिस्ती कुंटुंबाचा जीवनक्रम

22 पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. 24 ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. 25 पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल. 28 याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. 29 कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. 30 कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. 31 "म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील." 32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. 33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.

Veja também

Publicidade
Efésios
Ver todos os capítulos de Efésios
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-